Type Here to Get Search Results !

MJW News

MJW News

धुळे: आग्रा रोडवरील सट्टा अड्ड्यावर दोन गटात फायरिंग, अवैध धंद्यांवर निपक्षपाती कोम्बिंग ऑपरेशन करा - एडवोकेट पंकज गोरे यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

 MJW न्यूज मराठी | धुळे | 28 सप्टेंबर 2026




धुळे: आग्रा रोडवरील सट्टा अड्ड्यावर दोन गटात फायरिंग, अवैध धंद्यांवर निपक्षपाती कोम्बिंग ऑपरेशन करा - एडवोकेट पंकज गोरे यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी



धुळे -काल संध्याकाळी आग्रा रोडवरील मनोहर चित्र मंदिरासमोर असलेल्या सट्टा पिढीवर दोन गटात फायरिंग झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे धुळे शहरात पुन्हा एकदा अवैध धंदे आणि वाढती गुन्हेगारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना महाराष्ट्र सहसचिव एडवोकेट पंकज गोरे यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडे धुळे जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांवर कार्यवाही करून निपक्षपाती कोम्बिंग ऑपरेशन करण्याची मागणी केली आहे.


९ दिवस उपोषणानंतरही कारवाई नाही?


आम्ही ९ दिवस साखळी उपोषण केले, त्यानंतर पोलीस प्रशासनाने लेखी आश्वासन दिले होते. त्या ९ दिवसात सामान्य धुळेकरांनी ज्या अवैध धंद्याबाबत तक्रारी केल्या, त्या सर्वांची यादी आम्ही SP विशाल आनंद यांना दिली होती. त्यांनी कारवाईचा शब्द दिला होता. मग त्या यादीतील किती अवैध धंद्यांवर कारवाई झाली? जर कारवाई झाली असती तर कालची फायरिंगची घटना घडली नसती, असा सवाल पंकज गोरे यांनी उपस्थित केला.


धुळे अवैध धंद्याचा बालेकिल्ला


आज धुळे जिल्हा अवैध धंद्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. ही ओळख पुसून कायद्याचा बालेकिल्ला कधी होणार? कधी तलवार, कधी चाकू तर आता थेट भर बाजारात बंदुका निघत आहेत. इतके असुरक्षित धुळे कधीच पाहिले नव्हते, असे गोरे म्हणाले.


सर्व अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करून कोम्बिंग ऑपरेशन करावे, अन्यथा भविष्यात सामान्य धुळेकर नाहक बळी ठरेल आणि त्यास पोलीस प्रशासन जबाबदार असेल. तसेच कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही त्यांनी दिला.


आमदारांनी राजीनामा द्यावा


धुळे शहराचे आमदार अनूप अग्रवाल जे स्वतःला सालदार म्हणवतात, त्यांच्या कार्यकाळात सर्वात जास्त अवैध धंदे वाढले आहेत. त्यांच्या कार्यालयापासून २०० मीटरवर फायरिंग होत असेल तर ते जबाबदारी पार पाडण्यास असक्षम आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही एड. गोरे यांनी केली.


यावेळी स्वप्नील सोनवणे, सौरभ जवराल, निलेश चौधरी, पवन खांडरे, गोकुळ येलमामे, ज्ञानेश्वर देवरे आदी उपस्थित होते.


        MJW न्यूज मराठी 

 सत्याचा शोध, जनतेचा आवाज

Post a Comment

0 Comments