MJW न्यूज मराठी | धुळे | 28 सप्टेंबर 2026
धुळ्यात 2007 पासून वसतिगृहाचे काम रखडले, BSP चा इशारा - 5 ऑक्टोबरला विशेष समाज कल्याण कार्यालयासमोर ढफ वाजवून तीव्र आंदोलन करणार!
धुळे : विशेष समाज कल्याण कार्यालय अंतर्गत धुळे जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतिगृहाच्या मागणीसाठी बहुजन समाज पार्टी, धुळे आक्रमक झाली आहे. या संदर्भात पक्षाच्या वतीने विशेष समाज कल्याण कार्यालय, जिल्हा धुळे यांना निवेदन देण्यात आले आहे.
बहुजन समाज पार्टीचे धुळे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब सिध्दार्थ पारेराव यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
काय आहे निवेदनात?
धुळे शहरातील साक्री रोड महिंदळे शिवार येथील हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्राजवळ मागासवर्गीय जाती - बौद्ध, मांग, चांभार यासारख्या ५९ जातीच्या मुला-मुलींसाठी वसतिगृह व्हावे, यासाठी माजी जिल्हाधिकारी प्राजक्ता लवंगारे यांनी सन २००७ मध्ये प्रशासनाच्या आदेशाने २ हेक्टर जागा आरक्षित केली होती.
परंतु प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गेल्या 18 वर्षांपासून वसतिगृहाच्या कामासंदर्भात कुठलेही गांभीर्य घेण्यात आलेले नाही. या भूमिकेमुळे मागासवर्गीय मुला-मुली आपल्या हक्काच्या वसतिगृहापासून वंचित राहिले आहेत, असा आरोप BSP ने केला आहे.
5 ऑक्टोबरला ढफ आंदोलन
या मागणीसाठी दि. 5 ऑक्टोबर 2026 रोजी विशेष समाज कल्याण कार्यालयासमोर ढफ वाजवून तीव्रस्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे. जर या आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्यास यापुढील धरणे आंदोलन मोठ्या स्वरूपाने करण्यात येईल, याची प्रशासनाने दखल घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
प्रमुख मागणी -
१) वसतिगृहाच्या बांधकामासाठी आराखडा निविदा प्रक्रिया तात्काळ राबविण्यात यावी.
हे निवेदन सामाजिक न्याय मंत्री (महाराष्ट्र राज्य), पालकमंत्री धुळे जिल्हा, खासदार धुळे लोकसभा, आमदार धुळे विधानसभा आणि जिल्हाधिकारी धुळे यांनाही पाठविण्यात आले आहे.
निवेदनावर पुणे-खान्देश झोन प्रभारी राज चव्हाण, जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पारेराव, जिल्हा प्रभारी योगेश जगताप, शहर विधानसभा अध्यक्ष संदेश अहिरे राजदीप आगळे, विशाल धिवरे, विजय भामरे,विजय देवरे जितेंद्र खैरनार, देवेंद्र पाटील, महेंद्र सामुद्रे, उमाकांत कढरे, निहाल अहमद, सुनील मोरे, मिलिंद वाघ यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.



Post a Comment
0 Comments