*ST सवलतीला 199 रु. च्या स्मार्ट कार्डची अट; रोहित पवारांची सरकारवर टीका*
*01 सप्टेंबर 2026:*
राज्य सरकारने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ST प्रवासात सवलत जाहीर केली असली तरी, त्या सवलतीसाठी 199 रुपयांच्या स्मार्ट कार्डची अट घालण्यात आली आहे. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र टीका केली आहे.
सरकारच्या नवीन नियमानुसार, सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना 199 रुपयांचे स्मार्ट कार्ड काढावे लागणार आहे. त्यात किमान 100 रुपये बॅलन्स असणे बंधनकारक असेल. बॅलन्स संपल्यावर पुन्हा रिचार्ज करावा लागेल.
*"डिजिटल अडथळे निर्माण"*
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, "सवलत देण्याच्या नावाखाली सरकारने नवीन डोकेदुखी निर्माण केलीय. ग्रामीण भागातील अनेक ज्येष्ठ नागरिक डिजिटल साक्षर नाहीत, काही निरक्षर आहेत. त्यांना कार्ड घेणं, रिचार्ज करणं, बॅलन्स तपासणं यासाठी प्रत्येक वेळी दुसऱ्यावर अवलंबून रहावं लागणार आहे."
त्यांनी पुढे म्हटले, "सरकारने सवलत दिली पण असले डिजिटल अडथळे निर्माण करून त्यांची थट्टाच केली जात आहे. सवलत देताना ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी वाढवू नयेत. अन्यथा 'भीक नको पण कुत्रा आवर' या म्हणीप्रमाणे 'सवलत नको पण तुमच्या नियमांना आवर' अशी वेळ येईल."
*लाडकी बहीण योजनेचाही उल्लेख*
रोहित पवार यांनी लाडकी बहीण योजनेचा दाखला देत म्हटले की, "मतांसाठी लाडक्या बहिणी पात्र होत्या, पण सत्ता मिळताच या सरकारने 1 कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले."
या नवीन अटीमुळे ग्रामीण भागातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
*सत्याचा शोध, जनतेचा आवाज - http://www.mjwnews.in.net*


Post a Comment
0 Comments