मोठी बातमी! महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेला मुदतवाढ, अंतिम मतदार यादी आता 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार; BLO घरी येऊन कागदपत्रे घेणार
MJW न्यूज मराठी | मुंबई | 27 सप्टेंबर 2026
महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) प्रक्रियेला भारत निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विनंतीची दखल घेत आयोगाने आज झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
नवीन वेळापत्रक काय?
- दावे व हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत: 12 ऑक्टोबर 2026
- प्राप्त नोटिसा, दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत: 10 नोव्हेंबर 2026
- महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी प्रसिद्धी: 16 नोव्हेंबर 2026 रोजी
BLO घरी जाऊन कागदपत्रे घेणार
विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान ‘जुळणी न झालेले मतदार’ (Unmapped) किंवा ‘तार्किक विसंगती’ (Logical Discrepancies) या कारणांमुळे ज्या नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशा मतदारांच्या घरी जाऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आवश्यक कागदपत्रे संकलित करतील.
कार्यालयात जाण्याची गरज नाही
कागदपत्रांचे संकलन घरातूनच करण्यात येणार असल्याने संबंधित मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी मतदार नोंदणी अधिकारी (ERO) किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांच्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. केवळ अपवादात्मक परिस्थितीतच ऑनलाइन पद्धतीने सुनावणी घेतली जाईल. अशा सुनावणीस मतदाराच्या वतीने कुटुंबातील कोणताही प्रौढ सदस्य उपस्थित राहू शकणार आहे.
बेघर, मजूर व गरजूंसाठी विशेष मदत कक्ष
राज्यातील बेघर नागरिक, मजूर, गरीब तसेच रात्र निवाऱ्यांमध्ये (Night Shelters) राहणाऱ्या नागरिकांना मतदार नोंदणी व मतदार यादीतील दुरुस्तीच्या प्रक्रियेत सुलभता मिळावी, यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना (DEO) गरजेनुसार विशेष मदत कक्ष (Help Desks) आणि विशेष शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
MJW न्यूज मराठी
सत्याचा शोध, जनतेचा आवाज
Source: @ECISVEEP / CEO Maharashtra


Post a Comment
0 Comments