Type Here to Get Search Results !

MJW News

MJW News

धुळ्यात अवैध धंद्यांविरोधातील आंदोलनाचा सातवा दिवस; ‘अवैध धंद्यांची’ प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत प्रशासनाचा निषेध

 धुळ्यात अवैध धंद्यांविरोधातील आंदोलनाचा सातवा दिवस; ‘अवैध धंद्यांची’ प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत प्रशासनाचा निषेध



धुळे: धुळे शहर व परिसरातील कथित अवैध धंद्यांना आळा घालून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी ॲड. पंकज गोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाचा आज सातवा दिवसही आक्रमक आंदोलनाने गाजला.

सलग सात दिवस आंदोलन सुरू असूनही प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांशी चर्चेसाठी ठोस पुढाकार घेतला जात नसल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

*प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून अग्निडाग*

आंदोलनाच्या सातव्या दिवशी प्रशासनाच्या कथित निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी ‘अवैध धंद्यांची’ प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. ही अंत्ययात्रा आंदोलन स्थळावरून पोलीस अधीक्षक कार्यालयावर जाऊन गेटवर विसावा दिला. त्यानंतर पुन्हा आंदोलन स्थळी येऊन अंत्ययात्रेस अग्निडाग देऊन प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला.

प्रतिकात्मक अंत्ययात्रेदरम्यान आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाने नागरिकांच्या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी केली.

*“प्रशासनावर नेमका कुणाचा दबाव?” - ॲड. पंकज गोरे*

यावेळी ॲड. पंकज गोरे यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.

> "अवैध धंद्यांचा प्रश्न गंभीर असताना प्रशासन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यास पुढे का येत नाही? नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष का केले जात आहे? प्रशासनावर नेमका कुणाचा दबाव आहे?"

असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

सामान्य नागरिक किंवा छोट्या व्यावसायिकांवर कारवाई करताना प्रशासनाची यंत्रणा तत्परतेने कार्यरत होते, मग शहरातील कथित अवैध धंद्यांविरोधात कारवाई करताना अशीच तत्परता का दाखवली जात नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

*धुळे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न*

धुळे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब आमच्या घरातील आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी आमचा हा लढा आहे. अवैध धंद्यांचा मुद्दा हा केवळ कायदा-सुव्यवस्थेपुरता मर्यादित नसून त्याचा परिणाम शहरातील सामाजिक वातावरण, तरुणाई आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर होत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.

शहरात अवैध धंद्यांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण किंवा पाठबळ मिळू नये. तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबंधित यंत्रणांनी त्यांची निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

*आंदोलनाची पुढील दिशा काय?*

सातव्या दिवशी काढण्यात आलेल्या प्रतिकात्मक अंत्ययात्रेमुळे आंदोलनाला आणखी आक्रमक स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रशासनाने तातडीने आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

प्रशासनाकडून ठोस आणि सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास आंदोलनाची तीव्रता आणखी वाढविण्याचा इशारा ॲड. पंकज गोरे यांनी दिला आहे.

आता प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आंदोलनस्थळी चर्चेसाठी पाठवणार का, तसेच कथित अवैध धंद्यांविरोधात प्रत्यक्षात कोणती कारवाई केली जाणार, याकडे धुळेकरांचे लक्ष लागले आहे.


या आंदोलनात पंकज भारस्कर, संदीप चौधरी, ज्योती ताई सोनवणे, मयूरी सोनवणे, सागर साळवे, सागर निकम, सुरज भावसार, मनोज गवळी, अजय चौधरी, बंटी गोरे, सोनू मुर्तडकर, स्वप्नील सोनवणे, विपुल भारस्कर, गोकुळ येलमामे, दर्शन खंबायत, सौरभ जवराळ, मुकेश जाधव, ज्ञानेश्वर देवरे, प्रवीण पाटील, सिद्धार्थ गोरे, अक्षय लाड यांच्यासह अनेक आंदोलक सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments