Type Here to Get Search Results !

MJW News

MJW News

कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी, मराठी शाळांसाठी 0.1% पण नाही? न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांची नाराजी

 


*कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी, मराठी शाळांसाठी 0.1% पण नाही? न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांची नाराजी*


*धुळे | MJW न्यूज मराठी*  

कुंभमेळा आणि मुंबईतील सागरी मार्गिका सारख्या प्रकल्पांसाठी सरकार हजारो कोटींचा निधी देत आहे. पण त्यातील फक्त 0.1% रक्कम जरी मराठी शाळांसाठी खर्च केली असती, तरी राज्यातील 100 ते 150 मराठी शाळा बंद पडण्यापासून वाचल्या असत्या. अशी खंत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी व्यक्त केली आहे.


धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता शिरपूर नगरपरिषदेच्या पांडू बापू माळी शाळेला भेट देताना न्या. वराळे बोलत होते. याच शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले आहे.


*मराठी शाळा बंद होणे चिंतेची बाब*

न्या. वराळे म्हणाले, "माझे संपूर्ण शिक्षण जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत झाले. मराठी शाळेने मला व्यापक आणि उदारमतवादी दृष्टी दिली. बंधुभाव आणि सामाजिक जाणीव या भाषेनेच शिकवली. त्यामुळे मराठी शाळा बंद पडत असतील तर ही अत्यंत चिंतेची बाब आहे."


*आश्रमशाळांची स्थिती गंभीर*

आश्रमशाळांमधील मुलींना अजूनही जमिनीवर झोपावे लागत असल्याचे सांगून त्यांनी खंत व्यक्त केली. अलीकडेच एका आश्रमशाळेत जमिनीवर झोपणाऱ्या 3 मुलींचा सर्पदंशाने मृत्यू झाला. एक मुलगी अजूनही उपचार घेत आहे. 


"शिक्षणासाठी अर्थसंकल्पात वाढ होणे गरजेचे असताना उलट ती कमी होत आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढत असताना शिक्षणावरील खर्चही वाढायला हवा," असेही न्या. वराळे म्हणाले.


मराठी विषय प्रथम भाषा असूनही विद्यार्थी त्यात नापास होत असल्याची बाबही त्यांनी चिंताजनक असल्याचे सांगितले.


*ठळक मुद्दे:*

- कुंभमेळा, मार्गिका सारख्या प्रकल्पांसाठी हजारो कोटी खर्च

- 0.1% निधी शाळांसाठी दिला असता 100-150 मराठी शाळा वाचल्या असत्या  

- आश्रमशाळांमध्ये सुविधांचा अभाव, सर्पदंशाने 3 मुलींचा मृत्यू

- शिक्षणावरील अर्थसंकल्पीय तरतूद कमी होत आहे



*Tags:* #MarathiSchool #SupremeCourt #JusticePrasannaVarale #Dhule #Education #MJWNews


       मिलिंद वाघ  

*मुख्य संपादक - MJW न्यूज मराठी*

Post a Comment

0 Comments