धुळे, दि. 06 ऑक्टोबर 2026 | MJW न्यूज मराठी
धुळे - विशेष समाज कल्याण विभागा अंतर्गत धुळे जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला-मुलींसाठी मंजूर असलेल्या शासकीय वसतिगृहाच्या बांधकामाला गती न मिळाल्याने बहुजन समाज पार्टी, जिल्हा धुळे आक्रमक झाली आहे.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पारेराव यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 06/10/2026 रोजी मा. अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, धुळे यांना निवेदन देण्यात आले.
साक्री रोड, महिंदळे शिवर, हनुमान टेकडी, धुळे येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्यासाठी 2007 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी प्राजक्ता लवंगारे यांनी जागा मंजूर केली होती. गेल्या 18 वर्षांपासून या प्रकल्पाचा पाठपुरावा सुरू आहे.
अखेर उच्च स्तरीय सचिव समितीच्या दि. 23/02/2026 रोजीच्या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, देवपूर, जि. धुळे (विद्यार्थी क्षमता 250) या इमारतीच्या बांधकामास रु. 24.3 कोटी इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
शासन परिपत्रकानुसार दि. 20 मार्च 2025 रोजी हे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आले होते. नियमानुसार वसतिगृहाच्या बांधकामासाठी आराखडा व निविदा प्रक्रिया प्रसिद्ध करणे गरजेचे होते.
परंतु 6 महिने उलटूनही PWD स्तरावर कोणताही निर्णय न घेतल्याने काम रखडले आहे.
"शासनाचे परिपत्रक येऊनही कारवाई होताना दिसत नाही. आधीच या कामात दिरंगाई झाली आहे. तात्काळ शासन परिपत्रकाच्या आधारे कामकाजाला सुरुवात करावी, अन्यथा बहुजन समाज पार्टीकडून आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामाची जबाबदारी आपली व आपल्या कार्यालयाची असेल," असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनाची दखल घेत बांधकाम विभागीय कार्यकारी अधिकारी आर.आर. पाटील यांनी 90 दिवसाच्या आत निविदा पूर्व प्रक्रिया पूर्ण करून कामकाजास सुरुवात करू असे आश्वासन दिले आहे.
या निवेदन प्रसंगी पुणे झोन प्रभारी राज चव्हाण, जिल्हा प्रभारी योगेश जगताप, शहर विधानसभा अध्यक्ष संदेश अहिरे, धुळे जिल्हा प्रभारी राजदीप आगळे, युवक जिल्हाध्यक्ष विजय देवरे, धुळे जिल्हा सचिव विजय भामरे, उपाध्यक्ष जितेंद्र खैरनार, देवेंद्र पाटील, महेंद्र समुद्रे, उमाकांत कढरे, विशाल धिवरे,निहाल अहमद, सुनिल मोरे, सोशल मीडिया विभाग प्रमुख मिलिंद वाघ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments