Type Here to Get Search Results !

MJW News

MJW News

ढोल-ताशांच्या गजरात भगवा चौक गणेश मंडळाच्या गणरायाचे भव्य स्वागत फटाक्यांची आतषबाजी अन् १२ पावली नृत्यावर कार्यकर्त्यांचा ठेका; मंडळाचा २४ वा वर्धापन वर्ष

 ढोल-ताशांच्या गजरात भगवा चौक गणेश मंडळाच्या गणरायाचे भव्य स्वागत 

फटाक्यांची आतषबाजी अन् १२ पावली नृत्यावर कार्यकर्त्यांचा ठेका; मंडळाचा २४ वा वर्धापन वर्ष



धुळे, 15 सप्टेंबर 2026 | MJW न्यूज मराठी

शहरातील गणेशोत्सवाची परंपरा आणि उत्साहाची झलक दाखविणाऱ्या भगवा चौक गणेश मंडळाच्या गणरायाचे यंदा मोठ्या जल्लोषात वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, गणेशभक्तांचा उत्साह आणि कार्यकर्त्यांनी सादर केलेल्या १२ पावली नृत्यामुळे भगवा चौक परिसर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणाने भारावून गेला.


महाराणा प्रताप पुतळ्यापासून भव्य मिरवणूक  

भगवा चौक गणेश मंडळाच्या गणरायाच्या आगमनानिमित्त महाराणा प्रताप पुतळा येथून भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत मंडळाचे कार्यकर्ते आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या तालावर आणि ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ च्या जयघोषात मिरवणूक मार्गस्थ झाली. कार्यकर्त्यांनी पारंपरिक १२ पावली नृत्यावर ठेका धरत गणरायाच्या आगमनाचा आनंद साजरा केला.


मिरवणूक भगवा चौक येथे पोहोचल्यानंतर गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. गणरायाच्या दर्शनासाठी आणि स्वागतासाठी परिसरातील नागरिक व गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती.


२४ वर्षांची परंपरा कायम  

भगवा चौक गणेश मंडळाचे यंदाचे २४ वे वर्ष आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाच्या वतीने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गणरायाचे भव्य स्वागत, विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम तसेच समाजप्रबोधनपर देखावे हे मंडळाच्या गणेशोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.


दरवर्षी केवळ उत्सव साजरा न करता सामाजिक प्रश्नांकडे नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न मंडळाच्या माध्यमातून केला जातो. त्यामुळे भगवा चौक गणेश मंडळाच्या देखाव्यांकडे शहरवासीयांचे विशेष लक्ष असते.


यंदाही ज्वलंत विषयावर देखावा

मंडळाची समाजप्रबोधनपर देखावा सादर करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. यावर्षी एका ज्वलंत आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयावर देखावा सादर करण्यात येणार आहे. या माध्यमातून समाजातील वास्तव परिस्थिती नागरिकांसमोर मांडत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


गणरायाच्या आगमनाने भगवा चौक परिसरात गणेशोत्सवाची उत्सवी सुरुवात झाली असून, आगामी दिवसांत मंडळाच्या विविध उपक्रमांना सुरुवात होणार आहे. भक्ती, संस्कृती आणि समाजप्रबोधनाचा संगम साधत यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प आयोजक एड.पंकज गोरे यांनी केला आहे.


यावेळी एडवोकेट गुलाब गोरे, माजी नगरसेवक नंदकुमार गोरे, प्रवीण मुर्तडकर, विनोद रनमळे, आप्पा लहामगे, विजय गोरे, मनोज गवळी, मंगेश पिंगळे, बिल्लू शर्मा यांच्यासह भागातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


    MJW न्यूज मराठी

सत्याचा शोध, जनतेचा आवाज

Post a Comment

0 Comments