Type Here to Get Search Results !

MJW News

MJW News

₹11 चा आयव्ही सेट ₹325 ला! खाजगी रुग्णालयांची 2841% नफेखोरी, FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा धक्कादायक अहवाल

 ₹11 चा आयव्ही सेट ₹325 ला! खाजगी रुग्णालयांची 2841% नफेखोरी, FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा धक्कादायक अहवाल



मुंबई | MJW न्यूज मराठी 

खाजगी रुग्णालयात ॲडमिट झाल्यानंतर येणाऱ्या अव्वाच्या सव्वा बिलामुळे सर्वसामान्यांचा कंबरडा मोडतोय. या बिलांमागे रुग्णालयांची प्रचंड नफेखोरी असल्याचे एका अधिकृत अहवालातून उघड झाले आहे.


महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या राज्यस्तरीय पाहणीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. खाजगी रुग्णालये सामान्य वैद्यकीय उपकरणांवर खरेदी किमतीच्या तुलनेत तब्बल 2,841 टक्क्यांपर्यंत जादा दर आकारत आहेत.


अहवालात काय आढळले?

'वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी आणि विक्री किमतींमधील फरकावरील बाजार सर्वेक्षण अहवाल' नुसार आंतररुग्ण सेवेत वापरल्या जाणाऱ्या अनेक उपकरणांवर सर्रास नफेखोरी सुरू आहे.


उदाहरण बघा:

- आयव्ही सेट: रुग्णालयाची खरेदी किंमत ₹11.05 → रुग्णाला बिल ₹325 → 2841% नफा

- कॅथेटर: घाऊक दर ₹29.41 → रुग्णाला बिल ₹310 → 950% नफा

- सिरिंज, नेब्युलायझर किट, ऑक्सिजन मास्क यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंवरही असाच सपाटा


मुंढेंची केंद्राला मागणी

10 ऑगस्ट रोजी तुकाराम मुंढे यांनी केंद्रीय औषधनिर्माण विभाग आणि राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाला सविस्तर पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी रुग्णालयांच्या या मनमानी नफ्यावर मर्यादा घालण्याची आणि सर्व अत्यावश्यक उपकरणांना निश्चित किंमत देखरेख प्रणालीखाली आणण्याची मागणी केली आहे.


याविषयी बोलताना मुंढे म्हणाले, _"हा केवळ किमतींचा प्रश्न नसून रुग्णांच्या सुरक्षिततेचा आणि हक्काचा प्रश्न आहे. रुग्णालयाने एखाद्या उपकरणासाठी आकारलेली किंमत योग्य आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी रुग्णांकडे कोणतीही माहिती नसते. त्यामुळे उत्पादक आणि मध्यस्थांच्या नफ्यावर नियंत्रण आणण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवणे अत्यंत गरजेचे आहे."_


रुग्णांचा आवाज कोण ऐकणार?

आजारपणात रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक पर्याय नसल्याने कोणतेही बिल भरायला तयार होतात. याचाच फायदा घेऊन खाजगी रुग्णालये कोट्यवधींची कमाई करत आहेत का? असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.


       MJW न्यूज मराठी

सत्याचा शोध, जनतेचा आवाज


#Tukarammundhe #FDA #HospitalBill #HealthCare #PatientRights #MedicalLoot #MJWNewsMarathi

Post a Comment

0 Comments