Type Here to Get Search Results !

धुळ्यात 175 किलो मादक पदार्थ जप्त; कंपनीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

 धुळ्यात 175 किलो मादक पदार्थ जप्त; कंपनीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल



धुळे : सुमारे 175 किलो मादक पदार्थ भांगच्या सन्न गोळ्या अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने कंटेनरमधून वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर धुळे स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत सुमारे 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कंपनीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांना 16 ऑगस्ट 2026 रोजी मुंबई-आग्रा महामार्ग क्रमांक 3 वरून मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात धुळ्याकडे येणाऱ्या MP-09/GG-3199 क्रमांकाच्या कंटेनरमधून मादक पदार्थांची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी पथक तयार करून कारवाईचे नियोजन केले.


स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे तज्ज्ञ व पंचांसह मुंबई-आग्रा महामार्गावरील सोनेगीर टोलनाक्याजवळ सापळा रचला. यावेळी संशयित कंटेनर अडवून तपासणी केली असता त्यामध्ये प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये सुमारे 175 किलो मादक पदार्थ आढळून आला. या पदार्थाची अंदाजे किंमत 4 लाख रुपये, तर अशोक लेलँड कंटेनरची किंमत 15 लाख रुपये, असा एकूण 19 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.


या प्रकरणी कंटेनर चालक मोहम्मद साबीर मुशरफ खान (वय 47, रा. पवनपुरी, पालदा, इंदौर, मध्यप्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मादक पदार्थ भांगच्या सन्न गोळ्यांच्या डब्यांवर आयुर्वेदिक चूर्ण व पाचक वटी चूर्णाच्या गोळ्या असल्याचे लेबल लावून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे.


या प्रकरणात मेहता आयुर्वेदिक संस्थान, सन्न हाऊस, इंदौर (मध्यप्रदेश) ही कंपनी तसेच खरेदीदार इरफान मकबूल शेख, रा. अहिल्यानगर यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनेगीर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 280/2026 अन्वये BNS कलम 318(3), 336(3), 340(2) तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम 65 अ, 65 ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उपनिरीक्षक दिपक ढोके तसेच पोलीस अंमलदार सतीश जाधव, राहुल सानप, आरिफ पठाण, शिरीष मदाणे व सिद्धार्थ निकम यांच्या पथकाने केली.


मादक पदार्थांची अवैध वाहतूक व विक्रीविरोधात धुळे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे तस्करीच्या साखळीचा पर्दाफाश झाला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments